Skip to content
Manoj Deshmukh
All Marathi essays

मराठी निबंध · डिसेंबर 2025 · २ मिनिटे

दोरीवर चालताना तोल सांभाळणारा बांबू

By Manoj Deshmukh
दोरीवर चालताना तोल सांभाळणारा बांबू

( यातील "मी" हा केवळ प्रातिनिधिक असनू अनेकांची थोड्याबहुत फरकाने हीच गोष्ट आहे. याला आत्मस्तुती न समजता केवळ अनुभव म्हणून पाहावे )

मी नववीत असताना माझे वडील निवृत्त झाले. चार मोठ्या बहिणी आणि प्राथमिक शिक्षक असलेले वडील आणि मोठे कुटुंब यामुळे पैशाची नेहमीच चणचण असायची. आणि जेव्हा तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असते तेव्हा जग तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागते.

मला अजूनही आठवते की एका नातेवाईकाने आमच्याऐवजी माझ्या मावशीच्या प्रशस्त आणि तुलनेने "चांगल्या" घरी राहायला जायचे . तशी ही एक छोटीशी घटना, पण माझ्यासाठी एक काळजावरील जखम होती . अश्या अनेक छोट्या मोठया अनुभवांनी मनावर जखमा आणि महत्त्वाकांक्षा दोन्ही निर्माण केल्या. आमच्या परिस्थितीमुळे मी सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय निवडले. क्षमतेच्या अभावामुळे नाही - तर व्यावहारिकता हा एकमेव पर्याय होता म्हणून.

२१-२२ व्या वर्षी, मी इन्फोसिसमध्ये ₹१६,०००+ पगारावर प्रवेश केला (तेव्हा सोने प्रति १० ग्रॅम ४,४०० होते). २३-२४ व्या वर्षी, मी अमेरिकेत पोहोचलो - प्रत्येक रुपया मोजत मोठा झालेल्या व्यक्तीसाठी हे पूर्णपणे वेगळे जग.

अलिकडेच एका मित्राने विचारले, “तू पुण्यात एकटाच राहिलास आणि नंतर अमेरिकेत... तू आयुष्याचा आनंद का घेतला नाहीस - पार्ट्या, लक्झरी, मित्र, मैत्रिणी , फिरणे, खरेदी हे सर्व?”

माझे उत्तर सोपे होते: “मी हातात लांब बांबू घेऊन दोरीवर चालत होतो.”

एकीकडे संघर्ष आणि अनादराचे व्रण होते. दुसरीकडे माझ्या कुटुंबाला उंचावण्याच्या आकांक्षा होत्या. त्या बांबूने - त्या संतुलनाने - मी घेतलेल्या प्रत्येक निवडीला आकार दिला.

ही यशोगाथा नाही. आपल्यापैकी आपल्या पैकी अनेक जणांची हीच कहाणी आहे : "जिम्मेदारी आणि महत्वाकांक्षेचा बांबूच तुम्हाला दोरीवर चालताना संतुलन साधण्यासाठी मदत करतो "

आयुष्यात देखील, ज्या गोष्टी आपल्याला वाटतात त्या तसे ओझे नसतात उलट - आपला संघर्ष, जबाबदाऱ्या आणि सुरुवातीच्या अडचणी - बहुतेकदा आपल्याला स्थिर राहण्यास आणि पुढे जाण्यास मदत करणाऱ्यासाठीची शक्ती म्हणून कामी येतात.

Read next