काही दिवसांपूर्वी मी पीटर बेक (Peter Beck) यांच्याबद्दल वाचत होतो. एक काळ असा होता जेव्हा ते भांडी घासायचे , पण आज ते अब्जावधी डॉलर्सच्या 'Rocket Lab' या एरोस्पेस कंपनीचे मालक आहेत! थक्क करणारी गोष्ट म्हणजे, त्यांच्याकडे एरोस्पेस इंजिनिअरिंगची कोणतीही फॉर्मल डिग्री नाही.
हे वाचल्यावर साहजिकच मनात इतर नावं आली—बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, मार्क झकरबर्ग, गौतम अडाणी इत्याती. या कोणाकडेही जगातील नामांकित शिक्षण संस्थांची फॉर्मल इंजिनिअरिंग डिग्री नाही पण हजारो करोडीचे साम्राज्य उभे केले आहे.
होय, हे सगळे अपवाद आहेत. आणि सगळ्यांनी शाळा कॉलजे सोडले पाहिजे असे अजिबात माझे म्हणणे नाहीये , पण हे अपवाद एक गोष्ट नक्की सिद्ध करतात: यश कौशल्यामध्ये असतं, प्रमाणपत्रात नाही.
📉 एक जुनं समीकरण चांगले मार्क्स → चांगलं कॉलेज → चांगली डिग्री → चांगली नोकरी. हे समीकरण पिढ्यानपिढ्या चालत आलं. ते संस्था खूप भारी शिकवायच्या म्हणून नाही, तर त्यांच्याकडे एक अशी गोष्ट होती जी इतरांकडे नव्हती: 'ज्ञानाचा ॲक्सेस' जगातील सर्वोत्तम प्राध्यापकांकडून शिकायचंय? मग त्यांच्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घ्यावं लागायचं. उत्तम पुस्तकं, प्रयोगशाळा, मेंटॉर्स... हे सगळं एका बंद दरवाजाच्या मागे होतं, आणि तो दरवाजा उघडण्यासाठी मोठी फी मोजावी लागते.
पण आज ही मक्तेदारी कमी होत चालली आहे आणि पुढील काळात बऱ्याच प्रमाणात आणखी कमी होईल असे मला वाटते . त्याला खालील ४ मोठे स्ट्रक्चरल बदल कारणीभूत असतील :
१. ज्ञान आता चार भिंतींमध्ये कैद नाही 🧠: तुमच्या खिशातील एक AI ट्यूटर रात्री २ वाजतासुद्धा तुम्हाला क्वांटम फिजिक्स किंवा कठीण कायदे सोप्या भाषेत, तुमच्या गतीने आणि पूर्णपणे मोफत समजावून सांगू शकतो. ज्या गोष्टीसाठी कधीकाळी प्रवेश परीक्षेची गरज होती, तिथे आज फक्त 'जिज्ञासा' आणि एक 'डेटा पॅक' पुरेसा आहे.
२. शिकणे आणि पदवीएकमेकांपासून वेगळे होत आहेत 🛠️: कंपन्या—विशेषतः टेक इंडस्ट्रीमध्येआता फक्त तुमच्या डिग्रीचा कागद न बघता तुमचे प्रत्यक्ष काम, केलेले प्रोजेक्ट्स बघून हायरिंग करत आहेत. 'University of Reading' च्या एका अभ्यासाने तर शैक्षणिक जगताची झोप उडवली आहे: AI ने लिहिलेल्या ९०% पेक्षा जास्त उत्तरपत्रिका तिथल्या परीक्षकांना ओळखता आल्या नाहीत आणि त्यांनी AI ला सरासरीपेक्षा जास्त मार्क्स दिले! जर परीक्षा माणसाचं ज्ञानच तपासू शकत नसतील, तर त्या प्रमाणपत्राला किती अर्थ उरतो ? थोडक्यात, 'Proof-of-work' आता 'Proof-of-attendance' ची जागा घेत आहे.
३. प्रतिष्ठित पदव्यासांठी लागणार पैसा 💰: पारंपरिक उच्च शिक्षणासाठी लाखो रुपयांची फी, हॉस्टेलचा खर्च, शहरात स्थलांतर करणे भाग असते. पण AI च्या युगात दर्जेदार शिक्षण मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात उपलब्ध आहे. इतिहासात पहिल्यांदाच, जागतिक दर्जाचे शिक्षण मराठवाड्यातील एका शेतकऱ्याच्या मुलालाही तितक्याच सहजतेने उपलब्ध आहे, जितके पुण्याच्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या मुलीला.
४. बदलाविषयी उदासीनता⏳: मी स्वतः पाहिलंय, कॉलेजचा सिलॅबस बदलण्यासाठी कमिटीच्या मंजुऱ्या मिळवता मिळवता वर्षानुवर्षे निघून जातात. तोपर्यंत इंडस्ट्री दोन पावलं पुढे गेलेली असते. याउलट, AI टूल्स तुम्हाला या महिन्यात आलेली नवी टेक्नॉलॉजी किंवा या आठवड्यात बाजारात झालेला बदल रिअल-टाइममध्ये शिकवू शकतात. शिक्षण संस्था वर्षांमध्ये अपडेट होतात; हे जग आता दिवसांमध्ये अपडेट होतंय!
🎋 'Self-Learning' चा चेहरामोहरा बदललाय! बऱ्याच लोकांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही. स्वतःहून शिकण्याची (Self-learning) व्याख्याच आता बदलली आहे. पूर्वी स्वतः शिकण्यासाठी कमालीची शिस्त लागायची. एकट्याने वाचन करणे, यूट्यूबवर विखुरलेले व्हिडिओ शोधणे, कोणताही गाईड नसणे... पण AI ने या प्रवासाला अत्यंत सोपे आणि 'Interactive' बनवले आहे:
पर्सनलाइज्ड सिलॅबस: जो तुमच्या गरजेनुसार बदलतो. तुम्ही जिथे अडकता तिथे तो वेग कमी करतो, नवीन उदाहरणं देतो आणि पुढे जाण्यापूर्वी भरपूर सराव करून घेतो.
इन्स्टंट फीडबॅक: जिथे विद्यार्थ्याला आधी पेपर तपासण्यासाठी दोन आठवडे वाट पाहावी लागायची, तिथे आज AI तुमच्या कोडमधील किंवा निबंधातील चुका काही सेकंदांत दुरुस्त करून देतं. हा जलद फीडबॅक तुमची कौशल्ये वेगाने वाढवतो.
पॅसिव्ह रीडिंगऐवजी सिम्युलेशन: नुसतं वाचण्याऐवजी तुम्ही व्हॉईस एजंटसोबत थेट परदेशी भाषा बोलण्याचा सराव करू शकता, व्हर्च्युअल लॅबमध्ये केमिस्ट्रीचे प्रयोग करू शकता. शिस्त अजूनही विद्यार्थ्यालाच ठेवावी लागते, पण आता तो प्रवास एकट्याचा आणि अंधारातला राहिलेला नाही.
🏛️ मग शिक्षण संस्था संपणार का? असे म्हणणे ही एक टोकाची भूमिका असेल ! आपण AI आणि सोशल मीडियाच्या तोट्यांवर नक्कीच चर्चा केली पाहिजे आणि ती आवश्यकही आहे. पण या संस्था मरणार नाहीत; तर त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा आणि ते नक्की काय वेगळं देऊ शकतात याचा पुनर्विचार करावा लागेल. उद्याचा विद्यार्थी केवळ 'माहिती' (Information) मिळवण्यासाठी लाखो रुपये मोजणार नाही. त्यांना शिक्षण संस्थांची गरज असेल : ✅ व्याख्यान देणाऱ्या शिक्षकांऐवजी एका उत्तम 'मेंटॉर'साठी ✅ प्रयोगशाळा आणि प्रत्यक्ष संशोधनासाठी (Research) ✅ इंडस्ट्री नेटवर्किंग आणि संधींसाठी ✅ व्यक्तिमत्त्व विकासासाठी (Personality Development) ✅ कम्युनिटी, संस्कृती आणि कॅम्पस लाईफसाठी
माहिती आता मोफत आहे. पण अनुभव, संस्कृती आणि संधी हे अजूनही शिक्षण संस्थांचेच प्रॉडक्ट्स आहेत. ज्या संस्था स्वतःला या मूल्यांभोवती पुन्हा उभं करतील, त्या टिकतील. ज्या फक्त 'Gatekeeping' विकत राहतील, त्या संस्था मागे पडतील.
🌍 द इक्वलर (The Equalizer) तुम्ही कुठे जन्माला आलात, तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काय होती आणि तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं? गेल्या शंभर वर्षांत या तीन गोष्टींवरून तुमची प्रगती ठरायची. AI ने हे तिन्ही अडथळे मोडीत काढले आहेत. म्हणूनच AI हे केवळ एक तंत्रज्ञान नाही, तर ते आपल्या काळातील सर्वात मोठे 'Equalizer' आहे.
आज एखाद्या छोट्या गावात राहणाऱ्या जिद्दी विद्यार्थ्याच्या हातातही तेच ज्ञान उपलब्ध आहे जे MIT (अमेरिका) च्या विद्यार्थ्याकडे आहे. तिला आज गरज ॲडमिशनची नाही, तर 'इच्छेची' (Intent) आहे!
👉 येणाऱ्या दशकातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न "तुमच्याकडे कोणती डिग्री आहे?" हा नसेल. तर तो असेल— "तुम्ही प्रत्यक्ष काय करू शकता?" (What can you do?)
तुम्हाला काय वाटते, यापुढची मोठी नावं आपल्या भारतातील अशा 'Self-Taught' विद्यार्थ्यांमधून पुढे येतील का, ज्यांच्याकडे कोणतेही मोठे टॅग्स नाहीत? आणि जर तुम्ही स्वतः एखाद्या संस्थेत शिक्षक किंवा संचालक असाल, तर तुम्ही कोणत्या एका गोष्टीभोवती तुमच्या संस्थेची पुनर्रचना कराल? कमेंट्समध्ये नक्की सांगा! 👇
— मनोज देशमुख manojdeshmukh@gmail.com
