Skip to content
Manoj Deshmukh
All Marathi essays

मराठी निबंध · ऑगस्ट 2026 · ३ मिनिटे

Freshers IT Hiring Alert 2026: फ्रेशर ला IT क्षेत्रात नोकरी मिळवायची असेल तर…

By Manoj Deshmukh
Freshers IT Hiring Alert 2026: फ्रेशर ला IT क्षेत्रात नोकरी मिळवायची असेल तर…

डिग्री आहे, पण "काम" काय दाखवणार?

फ्रेशर मंडळींचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे 'जॉब नाही म्हणून अनुभव नाही आणि अनुभव नाही म्हणून जॉब नाही !

गेल्या महिन्यात एका ओळखीच्या मुलाचा फोन आला. "BE Computer झालं. ८.६ CGPA. २० कंपन्यांना अर्ज केला. एकही कॉल नाही. काय करावे?"

हाच प्रश्न अनेकांना पडलेला असेल ! मग IT मध्ये भरतीच बंद झाली का?

आकडे तसं सांगत नाहीत.

भारतातल्या GCC मध्ये, म्हणजे जगभरातल्या मोठ्या कंपन्यांच्या इथल्या टेक्निकल हब्समध्ये, या वर्षी सुमारे ५ लाख भरती होणार आहे. त्यातला सगळ्यात वेगाने वाढणारा गट ० ते ३ वर्षं अनुभव असलेला आहे.

पण त्याच अहवालात दुसरा आकडा आहे. या नव्या जागांपैकी ६४% जागांना AI, data किंवा automation ची समज लागते.

भरती चालू आहे. फक्त दार वेगळं आहे. आणि आपली मुलं अजून जुन्या दारावर उभी आहेत.

एक साधं उदाहरण : घरात कपाट बनवायचं आहे, सुतार बोलावला. तो येऊन बसला आणि म्हणाला, "माझं ITI झालंय, हे बघा सर्टिफिकेट." तुम्ही त्याला सांगाल की ते ठीक आहे, पण आधी तुम्ही बनवलेलं एखादं कपाट दाखवा.

Recruiter नेमकं हेच करतोय.

रेझ्युमेवर "Java, HTML, Python, Certified" अशी यादी असणं म्हणजे सर्टिफिकेट दाखवणं. आणि "हे बघा, मी बनवलेलं ॲप, लिंकवर क्लिक करून वापरून बघा" म्हणणं म्हणजे कपाट दाखवणं.

बहुतांश कॉलजे मध्ये आपण मुलांना सर्टिफिकेट गोळा करायला शिकवलं. कपाट बनवायला शिकवलंच नाही.

यावर खालील चार गोष्टी करता येतील.

१. एकतरी प्रोजेक्ट खरोखर लाईव्ह असू द्या : Weather App किंवा Todo List मध्ये recruiter ला आता नवीन काही दिसत नाही. त्याऐवजी असा प्रोजेक्ट बनवा जो कोणाची तरी खरी अडचण सोडवतो. बाबांच्या दुकानातलं उधारीचं रजिस्टर चालेल, किंवा सोसायटीच्या मेंटेनन्सचा हिशोब. विषय छोटा असला तरी हरकत नाही, तो खरा असला पाहिजे. आणि तो GitHub वर पडून ठेवू नका. Vercel किंवा Render वर मोफत live करा. "माझा कोड GitHub वर आहे" यापेक्षा "ही लिंक उघडून बघा" हे कितीतरी पुढे नेतं.

२. AI ला घाबरू नका, पण केवळ त्यावर विसंबून राहू नका (ओव्हर रेलिअन्स) : India Skills Report सांगतो की ९०% पेक्षा जास्त भारतीय कर्मचारी आता कामात AI टूल्स वापरतायत. म्हणजे Copilot, ChatGPT, Claude किंवा Cursor वापरता येणं ही आता वेगळी गोष्ट राहिलेली नाही. ती अपेक्षा आहे. पण एक अट आहे. Data Structures आणि basics पक्के हवेत, कारण मुलाखतीत AI ने लिहिलेला कोड तुम्हाला समजावून सांगावा लागतो. तिथे उघडं पडायला वेळ लागत नाही.

३. फक्त मोठ्या नावांच्या मागे धावू नका: TCS, Infosys, Wipro आजही हजारोंच्या संख्येने freshers घेतात. पण त्या रांगेत लाखो जण उभे आहेत. त्याच वेळी पुणे, बंगळुरू, हैदराबादमध्ये २,१०० पेक्षा जास्त GCC आहेत, आणि शेकडो product startups आहेत. तिथे रांग लहान असते आणि शिकायला मिळणारं काम मोठं. Wellfound किंवा LinkedIn वर हे शोधता येतं, पण तिकडे वळणारे कमी असतात.

४. "Job पाहिजे" असा मेसेज पाठवणं बंद करा: असा मेसेज recruiter ला दिवसाला शंभर वेळा येतो. त्यातले फार कमी वाचले जातात. त्याऐवजी असं लिहा: "सर, मी [हा प्रश्न] सोडवणारं छोटं ॲप बनवलंय, ही लिंक. तुमच्या टीममध्ये अशा कामाची गरज आहे का?" फरक एवढाच की या मेसेजमध्ये तुम्ही आधी काहीतरी दिलेलं असतं. आणि हे सोपं नाही, ते मान्य करायला हवं. एक खरा प्रोजेक्ट उभा करायला दोन-तीन महिने जातात, आणि तेवढा काळ हातात काहीच नसताना काढावा लागतो. घरचा दबाव वेगळाच. पण नुसते अर्ज पाठवत सहा महिने घालवण्यापेक्षा हे परवडतं.

शेवटी एक गोष्ट, आणि ती पालकांसाठी आहे : मुलाला साठ ठिकाणी नकार मिळाला की घरात जे वातावरण होतं, ते नकारापेक्षा जास्त नुकसान करतं. "शेजारच्याचा मुलगा लागला बघ" या वाक्याने आजवर कोणाचंही आयुष्य बदललेलं नाही.

त्याऐवजी विचारा: या महिन्यात तू काय बनवलंस?

मार्केट freshers साठी बंद झालेलं नाही. ते फक्त "फक्त डिग्री" साठी बंद झालंय.

© मनोज देशमुख

संदर्भ:

India's GCC hiring projected at ~510,000 in 2026; entry-level (0 to 3 yrs) fastest-growing band at 18% YoY; 64% of new roles need AI/data/automation skills. Business Today, via Outsource Accelerator (2026). ~2,120 GCCs operating in India. Zinnov-Nasscom / Business Today (2026).

First published on Facebook.

Read next