तुम्ही खालील प्रकारची रील / व्हिडिओ नक्की पहिले असेल :
हातात फलक, डोक्याला पट्टी, गळ्याच्या शिरा ताणून घोषणा देणार तरुण किंवा तरुणी. पण पत्रकार माईक पुढे करतो आणि विचारतो "हे आंदोलन नेमकं कशासाठी?" त्यावर उत्तर असते "सरकार चुकीचं करतंय!"
"नेमकं काय चुकीचं? कोणता कायदा?"
आणि मग... माईक पासून दूर जाणे किंवा शांतता !
हे सर्वच सरसकट असेच असते असे अजिबात नाही.
सत्तेतलं सरकार चुकू शकतं मग ते कोणत्याही पक्षाचं असो. अशा वेळी सामान्य माणसाला रस्त्यावर उतरून मोर्चा, निदर्शनं करण्याची गरज अगदी खरी असू शकते. संयुक्त महाराष्ट्रासाठी शंभराहून अधिक जणांनी प्राण दिले. राजस्थानातल्या मजूर-शेतकऱ्यांच्या जनसुनवाईंतून पुढे २००५ चा माहितीचा अधिकार कायदा आला. लोकशाहीत आंदोलन हा हक्क आहे, आणि तो असलाच पाहिजे.
माझा मुद्दा त्यांच्याबद्दल नाही. माझा प्रश्न आहे की उठसूठ, अगदी असंबद्ध मुद्द्यांवर कोणत्याही मोर्च्यात सामील होणारी मंडळी नेमकी कोण असतात?
बाजू घेणं आणि विषय माहीत असणं
२०२० मध्ये कृषी कायद्यांवरून देशभर वादळ उठलं होतं. त्याच वेळी Gaon Connection ने १६ राज्यांतल्या ५,०२२ शेतकऱ्यांचा सर्व्हे केला. त्याचं विश्लेषण करताना योगेंद्र यादव जे स्वतः या कायद्यांच्या विरोधात होते, यांनी लिहिलं: समर्थन करणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या, दोन्ही गटांतल्या निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना कायद्यांचे काहीही तपशील माहीत नव्हते.
हा सर्व्हे आंदोलकांचा नव्हे, सर्वसाधारण शेतकऱ्यांचा होता. पण मुद्दा स्पष्ट आहे की बाजू घेणं आणि विषय माहीत असणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
मग विषय माहीत नसताना एवढा राग येतो कुठून?
खदखदीला सोयीचं लक्ष्य
माणसाच्या आत खूप काही साचत असतं. स्वतःकडून पूर्ण न झालेला अपेक्षा, न मिळालेली बढती, धंद्यातलं अपयश, नात्यांतला दुरावा, "आपली कोणाला किंमतच नाही" ही भावना.
मानसशास्त्रात याला Displaced Aggression म्हणतात. ज्याच्यावर खरा राग आहे तो ताकदवान असेल, तर राग दुसऱ्या, सोयीच्या लक्ष्यावर निघतो. साहेब ऑफिसमध्ये ओरडले की माणूस घरी येऊन मुलांवर ओरडतो. एका meta-analysis ने हा प्रकार वारंवार आणि ठामपणे आढळणारा असल्याचं नोंदवलं आहे.
माझं निरीक्षण असं आहे की अशा खदखदीसाठी "सरकार" हे सगळ्यात सोयीचं लक्ष्य आहे. ते समोर येऊन उत्तर देत नाही, पगार कापत नाही, आणि त्याच्यावर ओरडलं की तुम्ही "जागरूक नागरिक" ठरता.
अमेरिकेत आठ अभ्यासांत जावपास अकरा हजार लोकांवर झालेल्या संशोधनात (American Political Science Review, २०२३) "सगळं जाळून टाका, नव्याने सुरू करू" या भावनेला नाव मिळालं होते Need for Chaos. ती सगळ्यात जास्त आढळली ज्यांना समाजात आपण बाजूला फेकले गेलो आहोत असं वाटतं, आणि ज्यांना प्रतिष्ठेची भूक आहे अश्या मंडळींमध्ये.
मेलेल्या सापाला मारणं
आपल्याकडे म्हण आहे मेलेल्या सापाला मारणे.
साप आधीच मेलेला. काठी आपटली की बघणाऱ्यांना वाटतं, काय धाडसी माणूस! कोणाला कळलं नाही तर कौतुकच कौतुक. आणि साप चावायची भीती? शून्य.
उठसूठ मोर्च्यात जाणं बरंचसं असंच असतं. गर्दीत चेहरा हरवलेला. कोणाला हिशेब द्यायचा नाही. रील व्हायरल झाला तर "क्रांतिकारी". आणि गुंतवणूक ? एक दिवस, थोडा घसा, आणि मोबाईलची बॅटरी.
ऑफिसमध्ये मात्र साप जिवंत असतो
रस्त्यावर "सरकार चोर आहे" म्हणणारा हाच माणूस, ऑफिसमध्ये मॅनेजरसमोर "हा निर्णय चुकीचा आहे" म्हणायला दहा वेळा विचार करतो.
कारण तिथे appraisal आहे, increment आहे, आणि "हा जरा जास्तच बोलतो" असा शिक्का आहे.
NYU च्या एका अभ्यासात (Journal of Management Studies, २००३) ४० पैकी ३४ नोकरदारांनी (८५%) सांगितलं की महत्त्वाचा मुद्दा असूनही त्यांनी तो वरिष्ठांसमोर किमान एकदा मांडला नाही. कारणं? शिक्का बसेल, संबंध बिघडतील, काही फरक पडणार नाही, बदला घेतला जाईल.
अर्थशास्त्रज्ञ Bryan Caplan याला Rational Irrationality म्हणतात कारण जिथे चुकीची किंमत स्वतःच्या खिशातून जाते, तिथे माणूस शहाणपणाने वागतो; जिथे वैयक्तिक किंमत जवळपास शून्य, तिथे तो मनसोक्त भावनेच्या आहारी जातो.
साधं गणित. जिथे किंमत मोजावी लागते, तिथे मौन. जिथे किंमत शून्य (किंवा थोडा फायदा) , तिथे शौर्य.
राग काढून संपत नाही
"मनातलं बाहेर काढलं की बरं वाटतं" पण संशोधन उलटं सांगतं.
Brad Bushman यांच्या ६०० विद्यार्थ्यांवरच्या प्रयोगात (२००२), चिडवणाऱ्याचा चेहरा आठवत पंचिंग बॅगवर ठोसे मारणारा गट सगळ्यात जास्त रागावलेला आणि आक्रमक निघाला. काहीच न करणारा गट सगळ्यात शांत.
खदखद बाहेर काढून संपत नाही, ती पेटत राहते. कदाचित म्हणूनच अशी मंडळी एका मोर्च्यातून दुसऱ्या मोर्च्यात फिरत राहतात आणि आतलं दुखणं तसंच राहत. फक्त दर वेळी नवा संधी /जागा शोधली जाते.
एक सोपी कसोटी
पुढच्या वेळी कोणताही मोर्चा, कोणताही रील बघाल, तेव्हा तीन प्रश्न विचारा :
१. याला नेमकं काय बदलायचं आहे, ते एका वाक्यात सांगता येतं का? २. यासाठी हा माणूस स्वतः कोणती किंमत मोजतो आहे? ३. हाच राग त्याने आपल्या ऑफिसमध्ये, सोसायटीत, घरात दाखवला असता का?
तिन्ही उत्तरं "नाही" असतील, तर तो साप मेलेला आहे.
First published on Facebook.
