काही वर्षांपूर्वी कामानिमित्त फिनलंडला गेलो होतो. नेमका त्याच दिवसांत World Happiness Report जाहीर झाला होता, आणि फिनलंड नेहमीप्रमाणे जगात पहिल्या क्रमांकावर.
मी माझ्या फिनिश business counterpart ला सहज विचारलं, "तुम्ही लोक खरंच इतके आनंदी आहात का?"
तो हसला. म्हणाला, "प्रश्न आनंदाचा नाही, आमच्या स्वभावाचा आहे. तुम्ही आम्हाला काहीही विचारलं, तर आम्ही नम्रपणे उत्तर देतो. वाद घालत नाही."
ते उत्तर माझ्या डोक्यात कायमचं राहिलं. यंदा २०२६ मध्ये फिनलंड सलग नवव्या वर्षी पहिला आला आहे.
आपल्याकडे दर वर्षी मार्च-जूनमध्ये एक बातमी हमखास येते. "आनंदी देशांच्या यादीत भारत पाकिस्तान, बांगलादेशच्याही मागे!" "शांततेच्या निर्देशांकात भारत ११६ व्या क्रमांकावर!" मग टीव्हीवर चर्चा, सोशल मीडियावर रील्स आणि विरोधकांचे पुरावे देणे.
पण आता या रँकिंग्सचाच हिशोब तपासायची वेळ आली आहे.
बांगलादेश: जून २०२४ ते ऑगस्ट २०२४
११ जून २०२४ रोजी Global Peace Index प्रसिद्ध झाला. १६३ देशांमध्ये बांगलादेश ९३ व्या क्रमांकावर, भारत ११६ व्या. म्हणजे कागदावर बांगलादेश भारतापेक्षा तेवीस पायऱ्या अधिक "शांत" देश होता. त्याआधी World Happiness Report 2023 मध्येही बांगलादेश ११८ व्या, तर भारत १२६ व्या क्रमांकावर होता.
त्यानंतर महिनाभरातच तिथे आरक्षणविरोधी आंदोलन पेटलं. ५ ऑगस्टला पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या अहवालानुसार १५ जुलै ते ५ ऑगस्ट या तीन आठवड्यांत सुमारे १,४०० लोक मारले गेले असावेत.
आता फ्रान्स
मी मागे "फ्रान्स जळतंय" या पोस्टमध्ये तिथल्या आंदोलनाची कारणं तपासली होती. आज आकडे दुसऱ्या बाजूने पाहू.
१७ ऑक्टोबरला पोलिसांच्या मते साडेपाच लाख लोक रस्त्यावर होते. जवळपास १,८०० जणांना अटक झाली, ५०० हून अधिक पोलीस, जेंडार्म आणि अग्निशामक जखमी झाले. मार्सेलमध्ये जमाव सिटी हॉलमध्ये घुसला, लिमोजमध्ये ऐतिहासिक सिटी हॉलला आग लागली.
आणि रँकिंग काय सांगतं?
Global Peace Index 2025:
फ्रान्स ७४ वा, भारत ११५ वा. V-Dem Liberal Democracy Index 2024: फ्रान्स ११ वा, भारत १०१ वा (१७९ देशांत). कागदावर फ्रान्स भारतापेक्षा कितीतरी पुढे. रस्त्यावर चित्र वेगळं.
गाडीचा मागचा आरसा
गाडी चालवताना मागचा आरसा फार उपयोगी असतो. मागून कोण येतंय, आपण कुठून आलो, हे तो अचूक दाखवतो.
पण समोर वळण आहे, खड्डा आहे की कोणी अचानक रस्त्यावर आलंय, हे तो दाखवत नाही. फक्त मागच्या आरशात बघून गाडी चालवली, तर अपघात ठरलेला.
जागतिक रँकिंग्स नेमकी अशीच आहेत. ती मागच्या वर्षी, मागच्या तीन वर्षांत काय होतं ते सांगतात. समाजाच्या आत काय धुमसतंय, हे त्यांना दिसत नाही.
हे निर्देशांक मोजतात तरी काय?
World Happiness Report साठी Gallup दर वर्षी प्रत्येक देशात साधारण १,००० लोकांना एकच प्रश्न विचारतं: "० ते १० च्या शिडीवर तुम्ही आज स्वतःला कुठे पाहता?" आणि तीन वर्षांची सरासरी काढली जाते.
१४० कोटींच्या देशासाठी हजार लोकांचं उत्तर, तेही तीन वर्षांची सरासरी. इथे फिनलंडमधल्या त्या मित्राचं उत्तर आठवतं. हा अहवाल "तुम्ही आनंदी आहात का?" असं विचारतच नाही; तो आयुष्याबद्दलचं समाधान विचारतो. आणि त्या शिडीवर प्रत्येक संस्कृती सारखं उत्तर देत नाही. कुठे तक्रार न करणं हा स्वभाव असतो, तर कुठे स्वतःला १० पैकी १० म्हणणं फुशारकी वाटते. हा सांस्कृतिक फरक रँकिंग ठरवताना वजा केला जात नाही.
Global Peace Index २३ निर्देशक वापरतो. त्यात लष्करी खर्च, शस्त्रसाठा, शेजारी देशांशी संबंध, बाहेरच्या संघर्षांत सहभाग हेही आहेत. सीमेवर पाकिस्तान आणि चीनसारखे शेजारी असलेल्या देशाला यात आपोआप गुण कमी पडतात, मग देशांतर्गत माणूस कितीही सुरक्षित असो.
लोकशाही निर्देशांक (V-Dem, EIU, Freedom House) मोठ्या प्रमाणावर तज्ज्ञांच्या मूल्यांकनावर चालतात. म्हणजे काही अभ्यासक प्रश्नावली भरतात आणि त्याचं गणित होतं. ही मतं अभ्यासू असतात, पण शेवटी मतंच. आणि हे तज्ज्ञ मोठ्या प्रमाणावर बातम्या आणि NGO अहवालांवर अवलंबून असतात. त्यामुळे जे माध्यमांत जास्त गाजतं, त्याचा प्रभाव मूल्यांकनावर पडण्याची शक्यता जास्त.
रँकिंग च्या या आकड्याने प्रभावित न होता या गोष्टींचा विचार करायला हवा :
१. एक रँक म्हणजे देशाचं प्रमाणपत्र नाही. कोणतीही बातमी "भारत अमुक व्या क्रमांकावर" अशी आली, तर आधी विचारा: हे मोजलं कसं? कोणी? केव्हाचा डेटा?
२. निर्देशांक "काय आहे" हे सांगतात, "काय होणार आहे" हे नाही. समाज किती काळ ताण सहन करू शकतो, संस्था संकटात टिकतात का, हे खरं मोजमाप. आणि ते यादीत येत नाही.
३. आपल्याकडे शिक्षणातही हेच आहे. NIRF रँक पाहून कॉलेज निवडणारे पालक, आणि त्याच कॉलेजमधून बाहेर पडून नोकरी शोधणारी मुलं. आकडा खोटा नसतो, पण तो पूर्ण सत्यही नसतो.
तुम्हाला काय वाटतं? देशाचं खरं आरोग्य मोजायचं असेल, तर तुम्ही कोणता एक निकष वापराल?
First published on Facebook.
